Tuesday, June 1, 2010

संस्कृतीचं रक्षण कराया हवं । ।

झुंजूमुंजू पहाट, आडावरचे रहाट
शेंदून पाणी आणाया, डोईवरी माठ
तांब्या, पितळेच्या ताटात थोडं जेवाया हवं।
आपणच आपल्या संस्कृतीचं रक्षण कराया हवं । ।

जात्यावरची गाणी, दळण दळते नानी
दारात तुळस, घरात खलबत्ता, सर्वत्र आजीचीच सत्ता
सर्वांशीच आदरानं वागाया हवं ।
आपणच आपल्या संस्कृतीचं रक्षण कराया हवं । ।

कपाळभर कुंकू, लाजेनं खाली वाकू
हातभर बांगड्या, खेळ कब्बड्डी, लंगड्या
गावरान खेळालाही सर्वांसमोर आणाया हवं ।
आपणच आपल्या संस्कृतीचं रक्षण कराया हवं । ।

पायात पैंजन, गळ्यात घंटन
हातात पाटल्या , कंबरपट्ट्यानं नटल्या
अंगभर दागिन्यात स्वत:ला सजवाया हवं ।
आपणच आपल्या संस्कृतीचं रक्षण कराया हवं । ।

आपली वाणी, आपली नाणी
कोमल शब्दानी जवळीक आणी
प्रेम, आपुलकीनं एकजुट व्हाया हवं ।
आपणच आपल्या संस्कृतीचं रक्षण कराया हवं । ।

मी मराठी, माझी मराठी
महाराष्ट्र माझा बोलतो मराठी
मराठी बोलून जग बदलाया हवं ।
आपणच आपल्या संस्कृतीचं रक्षण कराया हवं । ।